काँग्रेस-भाजप सदस्य आक्रमक; भर सभागृहात महापौरांचा धिक्कार
सांगली प्रतिनिधी
मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यावरून महासभेत प्रचंड गदारोळ झाला. मागील सभेतील काही मंजूर विषयामध्ये आर्थिक गैव्यवहार झाल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. औचित्याच्या मुद्यांखाली यावर चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. यावरून वाद वाढत गेल्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजेंडय़ावरील सर्व विषय मंजूर करत सभा संपल्याचे जाहीर केले. यानंतर आक्रमक झालेल्या भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. मात्र चकवा देत महापौर सभागृहाबाहेर निघून गले. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. महापौर पळाले, महापौर पळाले अशा धिक्काराच्या घोषणा देत भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.
दरम्यान, सभा नियमाप्रमाणे पार पडली, असा दावा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. तर ही सभाच बेकायदेशीर होती. महापौर अल्प मतांमध्ये आले आहेत. याची जाणीव झाल्यानेच त्यांनी सर्व विषय मंजूर म्हणत चर्चा किंवा मतदान न घेताच सभागृहातून पळ काढला. यापुढे अशा कारभाराला संघटितपणे विरोध करू, असा इशारा भाजप गटनेने विनायक सिंहासने, ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिला. तर असा कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा उपमहापौर उमेश पाटील, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांनी दिला. महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मागील सभेचे (18 फेब्रुवारी) इतिवृत्त कायम करण्याचा विषय अजेंडय़ावर होता.
काँगेस-भाजप सदस्यांचा महापौरांना घेरावो
मागील महासभा कोरमच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरली होती. या विरोधात भाजप व काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बुधवार 20 एप्रिल रोजी सुनावणी आहे. तत्पूर्वी इतिवृत्त कायम करण्याचा विषय रद्द करावा अशी मागणी काँग्रेस व भाजपच्या 53 सदस्यांनी महापौर सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. याशिवाय भाजपच्या सविता मदने यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला होता. यावर चर्चा व्हावी, अशी मागणी सविता मदने, शेखर इनामदार यांच्यासह काँग्रेसच्या संजय मेंढे, संतोष पाटील आदी सदस्यांनी केली. मात्र महापौरांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. यामुळे आक्रमक झालेल्या भाजप सदस्यांनी महापौरांसमोर धाव घेतली. काँग्रेसचेही सदस्य यामध्ये सहभागी झाले. त्यांनी संयुक्तरित्या महापौरांना घेराव घातला.
अन् महापौरांनी महासभाच गुंडाळली
चोहो बाजूंनी महापौरांना घेरण्यात आले. औचित्याच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली. मात्र, महापौरांनी त्यांना जुमानले नाही. भाजपाचे युवराज बावडेकर यांनी मागील सभेतील काही मंजूर विषयांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला. भाजप व काँग्रेस सदस्यांचा वाढता विरोध लक्षात घेत राष्ट्रवादीचे नगरसेवकही मैदानात उतरले. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांनी सर्व विषय मंजूर करण्याची सूचना महापौर सूर्यवंशी यांना केली. काँग्रेसचे मंगेश चव्हाण, मयूर पाटील यांनी महापौरांना सरंक्षण दिले. वाढत्या गोंधळातच महापौर सूर्यवंशी यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा गुंडाळली.
धिक्काराच्या घोषणांनी सभागृह दणाणले
सभागृहातून बाहेर जात असताना स्थायी सभापती निरंजन आवटी यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी त्यांना अडविले. पुन्हा सभा सुरू करण्याची विनंती केली. मात्र त्यांना चकवा देत महापौर सभागृगातून निघून गेले. यामुळे आक्रमक झालेल्या भाजप व काँग्रेस नगरसेवकांनी महापौर पळाले, महापौर पळाले, अशा घोषणा देत संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. महापौरांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. महापौर सभागृहातून निघून गेल्यानंतर विरोधी पक्षनेते संजय मेंढे, सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी त्यांची महापौर दालनात भेट घेतली. सभागृहात अजूनही 53 सदस्य उपस्थित आहेत. महासभा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. महापौरांनी या मागणीलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या काँगेस व भाजपच्या सदस्यांनी सभागृहातच समांतर सभा घेतली. महापौरांवर टीकास्त्र सोडले.