जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षाव
बर्मिंगहम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालंय. अभिमानाची गोष्ट म्हणजे सांगलीच्या संकेत महादेव सरगरने भारताला हे पहिलं पदक जिंकून दिलय. ५५ किलो वजनी गटात संकेतने रौप्य पदक जिंकलय. संकेत सरगरने दोन फेऱ्यांमध्ये 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं. त्याला सुवर्णपदकाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली. संकेतचं मूळ गाव सांगली आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान पटकावलेला संकेत महादेव सरगर हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे. तसंच खेलो इंडीयाची सुवर्णपदक विजेती काजल सरगरचा भाऊ आहे.
अधिक वाचा- अमोल यादव यांची युरोप येथे ऑलम्पिक दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संकेतच्या रुपाने भारताला पहिलं पदक मिळालं. मूळचा सांगलीचा असलेल्या संकेतने यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलीच, पण चमकदार कामगिरी करून लोकांची त्याने मनंही जिंकली. त्याने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये १३५ वजन उचलून पदक जिंकले. गेल्या वर्षी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
संकेत सरगर कोण आहे?
संकेतचं मूळ गाव सांगली आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान पटकावलेला संकेत महादेव सरगर हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे. तो ५५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या वर्षी ताश्कंद येथे झालेल्या चॅम्पियनशिप 55 किलो स्नॅच स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
संकेतच्या रौप्यपदकाची कमाईची बातमी येताच सांगलीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. संकेतच्या मूळ गावी लोकांनी फटाके फोडून, गुलाल उधळून संकेतच्या यशाचा आनंद साजरा केला आहे. संकेतचं यश म्हणजे आम्ही आमचं यश समजतो. त्यांच्या प्रयत्नांना आज फळ मिळालं. तो खूप मेहनती आहे. भारताला कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत त्याच्या रुपात पहिलं पदक मिळालं, याच्याएवढा सर्वोच्च आनंद सांगलीकरांसाठी दुसरा कोणता नाही, अशा शब्दात संकेतच्या यशाचं सांगलीकरांनी कौतुक केलं.