जर पोलिसांनी आपल्याला परवानगी दिली तर पत्रकार म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 16 सप्टेंबरला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित राहू असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.
दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शनिवारी औरंगाबाद येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी औरंगाबादेत होणार आहे. पोलिसांनी परवानगी दिली आणि मला जर रोखले नाही तर मी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहीन. या पत्रकार परिषदेमध्ये मला फक्त मुख्यमंत्री शिंदे किती खोटे बोलतात हे पाहायचे आहे.”असेही ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुमारास त्यांच्या औरंगाबाद दौऱ्याचा उद्देश विचारला असता राऊत म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा औरंगाबादला येणार असल्याचे आम्हाला समजले. ते आम्हाला दिल्लीत भेटत नाहीत. त्यामुळे ही आमचीच जमीन असल्याने आम्ही शिवसैनिकांनी त्यांना औरंगाबादमध्ये भेटण्याचा बेत आखला आहे. मात्र त्यांचा दौरा आता रद्द करण्यात आला आहे.”