पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळय़ासाठी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी सोहळय़ातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पालिश करण्यात आले आहे. दर्शनबारी, सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. तुकोबांच्या पालखीचे उद्या देहूतून (दि. 10) तर माऊलींच्या पालखीचे रविवारी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे.
आषाढीवारीसाठी देहू आणि आळंदी नगरी गजबजुन गेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दहा जूनला देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदी, देहूत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थानाने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळय़ात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱयांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने काळजी घेतली आहे.
देहूतील तुकोबांच्या पालखी सोहळय़ात 329 दिंडय़ांची नोंद आहे. नव्याने 45 दिंडय़ा सोहळय़ात सहभागी होणार आहेत. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. देऊळवाडय़ातील स्वच्छतेसाठी 30 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहे. देऊळवाडय़ात सुरक्षेसाठी सोळा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नगरपरिषद प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग परिसरातील अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे पालखी मार्ग रुंद झाला आहे. नदी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. एक हजार फिरती स्वच्छतागृह ठेवण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य संचाचे वाटप करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.
आळंदीमध्ये घातपात, चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नये, यासाठी देऊळवाडय़ात दर्शनासाठी आलेल्या वारकऱयांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातूशोधक यंत्रणा बसविण्यात आली. देवस्थानची सध्या चार हजार क्षमतेची दुमजली दर्शनबारी इमारत असून, भाविकांची संख्या लक्षात घेता, ही क्षमता नदीपलीकडे तात्पुरती दर्शनबारी उभारून वाढविण्यात आली आहे. 15 हजार भाविक एकत्र येत दर्शन घेऊ शकतील इतकी ही क्षमता वाढविण्यात आली आहे. वारी काळात चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. पंधराशे फिरती शौचालये असणार आहेत. मंदिर, इंद्रायणी घाट परिसरासह महत्वाच्या ठिकाणी विद्युत दिवे लावले आहेत.