उपसरपंच निवडीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम
गावपातळीवर उपसरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरु
सरपंच ठरणार किंगमेकर
कोल्हापूर / कृष्णात चौगले
उपसरपंच निवडीमध्ये सरपंचास दोन मतांचा अधिकार कायम असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये नुकताच दिला. याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळत न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे उपसरपंच निवडीमध्ये काठावरचे बहुमत असल्यास सरपंचाची दोन मते निर्णायक ठरणार आहेत. काही गावांत सरपंच एका गटाचा आणि निर्णायक सदस्य संख्या दुसऱया गटाची आहे. तर अनेक गावांत दोन्ही गटाची सदस्य संख्या समसमान आहे. अशा ठिकाणी सरपंचाचे मत निर्णायक ठरणार आहे.
याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये पूर्वीच्या आदेशामध्ये मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठमध्ये झालेला निर्णय निदर्शनास आणला नव्हता. त्यामुळे 3 जानेवारी 2023 रोजी सरपंचाला पहिल्या फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकारास स्थगिती दिली होती. परंतु यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीतील निर्णयानुसार सरपंच हा पदसिद्ध सदस्य असतो त्यामुळे त्यांना पहिल्या फेरीमध्ये मत देण्याचा अधिकार आहे. तसेच उपसरपंच निवडीमध्ये समान मते पडल्यास पिठासीन अधिकारी सरपंच असतो. त्यामुळे त्याला निर्णायक दुसरे मत देण्याचाही अधिकार आहे असा न्यायालयाने निर्णय दिला होता. हा निर्णय नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर तो कायम करत याचिकाकर्त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या. त्यामुळे आता उपसरपंच निवडीमध्ये सरपंचाला दोन मते देता येणार आहेत.
474 गावांत होणार उपसरपंच निवड
जिह्यातील माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱया 474 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 28 च्या तरतुदीप्रमाणे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा बोलविणे आवश्यक आहे. त्यास अनुसरुन जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींची पहिली सभा 12 जानेवारी होणार आहे. या सभेत केवळ उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज करण्यात येणार आहे.
उपसरपंच पदाच्या बहुमानासाठी घडामोडींना वेग
जिह्यातील अनेक गावांत सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या गटाकडून उपसरपंच आपलाच व्हावा यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यामध्ये ज्या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती, त्या गावांत दोन पराभूत गट एकत्र येऊन आपल्याकडे सरपंच पद घेण्यासाठी रणनिती आखताना दिसत आहे. हे पद सदस्यांतून निवडता येत असल्यामुळे यासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरताना दिसत आहे. तर काठावरचे बहुमत असलेल्या गावांमध्ये सरपंचांची दोन मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे अनेक गावांत सरपंच किंगमेकर ठरणार आहेत.