पैसे न देता संशयित फरार, शेतकऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी
मर्ढे गावातील 11 शेतकऱ्यांकडून 70 ते 100 क्विंटल हळद विकत घेत त्यांना पैसे न देणाऱ्या भामट्य़ाविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजकुमार रमेशचंद्र सारडा (रा. दौलतनगर-करंजे, सातारा) असे त्यांचे नाव आहे. या शेतकऱ्यांकडून 70 ते 100 क्विटंल हळद विकत घेवून दोन वर्ष झाले तरी पैसे दिलेले नाहीत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2018 मध्ये राजकुमार सारडा याने मर्ढे ता. सातारा गावातील विजय तुकाराम शिंगटे (वय 39) या शेतकऱ्यांकडून हळद विकत घेतली. अशीच हळद वडुथ, गोवे, मालगाव येथील शेतकऱ्ंयाकडूनही घेतली. गेल्या दोन वर्षात त्याने 11 शेतकऱ्यांकडून हळद विकत घेतली आहे. या हळदीचे पैसे देतो असे सांगून दोन वर्ष झाले तरी पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांनी राजकुमार यांच्याकडे पैशाचा तगादा लावला. परंतु तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. तसेच काही दिवसांपासून हे शेतकरी त्याला फोन करत आहेत. त्यांचा फोन बंद असून कोणत्याही प्रकारे संपर्क झालेले नाही. यामुळे हळद विकत घेवून पैसे न देता फसवणूक झाल्याचे यांच्या लक्षात आले. यामुळे शुक्रवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येवून गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.