वार्ताहर/कास
सातारा कास रोडवरील पिसाणी ता. सातारा गावच्या हद्दीत विहिरीत पडून रान गव्याचा मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
शनिवारी सकाळी नामदेव दगडू गोगावले हे आपल्या गिरनाळी नावाच्या शिवरात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या विहिरीत भला मोठा रानगवा पडून त्याचा मृत्यू झाल्याचे निर्दशनास आले. अन्न पाण्याच्या शोधात वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळू लागले असून पाणी पिण्यासाठी आलेल्या रानगव्याला विहिरीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो चार-पाच दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला आसावा. सदर घटनेची स्थानिकांनी तात्काळ कास पठार वन समिती व सातारा वनक्षेत्रपाल निवृती चव्हाण यांना माहीती दिली असून कास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मात्र या पडीक शिवार व विहिरीकडे जाण्यासाठी वाहनाला कोणताही मार्ग नसल्याने मृत गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.