कुडाळ : प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जावळी तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांनी पुन्हा जावळी तालुका राष्ट्रवादीमध्ये आणण्यासाठी मोर्चेबांधणी करत भाजपचे शिवेंद्रराजे यांना शक्ती प्रदर्शनातून इशारा दिला आहे.
जावळी तालुक्यातील मेढा येथे तालुक्याच्या ठिकाणी भाजपच्या बालेकिल्ल्यातच आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आगामी निवडणुकांची झलक दाखवली आहे. जावळी तालुका भाजपचा असला तरी पुन्हा राष्ट्रवादी खेचून आणू शकतो असा संदेशच या शक्ती प्रदर्शनातून आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने शशिकांत शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी करत भाजपच्या बालेकिल्लात राष्ट्रवादीचाचा जयघोष केला.