उद्या थेट पाईप लाईन पूर्ण झाली तरच आम्ही विरोधकांचे कौतुक करणार आहोत अशी टोला भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना लगावला आहे. तसेच विकासकामे करत असताना एकमेकांचे श्रेय घेत बसण्यापेक्षा कौतुक करणे फार महत्वाचे आहे. सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा होत असताना प्रश्न मांडणे महत्वाचे आहे मात्र प्रश्नांची उत्तरे दिली जाणे हेदेखिल महत्वाचे असल्याचेही त्यांनी गोकुळच्या आणि होऊ घातलेल्या राजाराम कारखान्याच्या सभेच्या पार्श्वभुमीवर म्हटले आहे.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर भाष्य़ करताना ते म्हणाले, “प्रत्येक विधामसभेत घर चलो अभियान राबवले जात आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक, मान्यवरांच्या भेटी असे स्वरूप असून हे 2024 च्या विजयासाठी महत्वपूर्ण आहे.”असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “महाराष्ट्रात पक्षाचे 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. भाजप हा पक्ष अतिशय शिस्तप्रिय पक्ष असून लोकांना समाविष्ट करून मुलाखती घेऊनच त्यांना संधी दिली जाते. जिल्ह्यामध्ये पक्षांतर्गत नाराजी असेल तर ती निश्चितपणे दूर करू. आमच्यातील एकही सदस्य बाहेर जाणार नाही. बंद झालेले कार्यालय सुरु होईल…असं झालं तर आनंद आहे. मात्र तशी काही बातमी माझ्यापर्यन्त आलेली नाही. लोकसभा विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यां सर्व निवडणुकीची तयारी सुरु आहे.”अशी माहीतीही त्यांनी दिली.
शरद पवार यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “सर्वांनी एकत्र मिळून काम केले तर NDA च्या 45 जागा निवडून येऊ शकतात. अजितदादांच्या प्रवेशामुळे शरद पवारसाहेब नरमले असं म्हणू शकणार नाही. त्यांचे वय जास्त असूनही ते राज्याचा दौरा करत आहेत. अजितदादा जसे आलेत ते विकासासाठी आलेत. जर पवारसाहेबसुद्धा आले तर निश्चितपणे आनंद होईल.” असेही ते म्हणाले.
कोल्हापूरात आलेल्या नविन इलेक्ट्रिक बसेसवर बोलताना ते म्हणाले, “केएमटी नुकसानमध्ये सुरु आहे. मात्र कोणत्या निधीतून बसेस आणल्या गेल्या आहेत त्याची माहिती नाही. मात्र कोल्हापूरकरांची सोय होत आहे हे महत्वाचं. येत्या काही दिवसात 100 इलेक्ट्रिक बसेस लवकरात लवकर येतील. त्याचप्रमाणे कोल्हापूर- मुंबईसाठी ही वंदेभारत एक्सप्रेस सुरु होईल.” अशी माहीती त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी थेट पाईपलाईनवर भाष्य केले. ते म्हणाले, “उद्या थेट पाईप लाईन पूर्ण झाली तर आम्ही त्याच कौतुक करणार आहोत. विकासकामे करत असताना एकमेकांचे श्रेय घेत बसण्यापेक्षा कौतुक करणे फार महत्वाचे आहे. मी विकासात्मक काम करणारा आहे. दक्षिण मतदार संघात अंमल महाडिक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्या मतदारसंघात अमल महाडिकांनी अनेक विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा विजय निश्चित आहे.” असे ते म्हणाले.