स्वस्तिक युनियन क्लबच्या 378 धावांची मजल : नागा भारतचे शतक
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे केएससीए बेंगळूर आयोजित सर मिरजा इस्माईल सय्यद ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लब-2 ने पहिल्या डावात 88 षटकात 378 धावा जमविल्या. त्यात बेळगावच्या सुजय सातेरीने आपले सलग दुसरे शतक तर नागा भारतने शतक झळकाविले.
बेंगळूर येथे चिन्नास्वामी क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लब-2 ने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी 88 षटकात 5 गडी बाद 378 धावा जमविल्या. त्यात बेळगावच्या सुजय सातेरीने 5 उत्तुंग षटकार, 10 चौकारांसह 146 चेंडूत 131 धावा करीत स्पर्धेतील सलग दुसरे शतक झळकाविले. त्याला कर्णधार नागा भारतने 1 षटकार, 13 चौकारांसह 122 धावा करीत शतक झळकाविले. एम. डी. ताहाने 4 चौकारांसह 30, यशवंतने 4 चौकारांसह 27, आशिष महेशने 1 षटकार, 3 चौकारांसह 25, कार्तिक सी. ए. ने 3 चौकारांसह 18 तर आयुष शेट्टीने 11 धावा केल्या. व्हल्चर क्लबतर्फे संतोख सिंगने 66 धावात 3 तर आर. जी. मोरे, अभिषेक आलावत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.