ग्रंथदिंडी, कथाकथन, कवि संमेलनाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन शनिवार दि. 18 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत रानकवी ना. धों. महानोर साहित्यनगरी (गोगटे रंगमंदिर) येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ. द. तु. पाटील राहणार आहेत. उद्घाटक म्हणून कर सल्लागार एम. एन. राजगोळकर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात कथाकथन, दुसऱ्या सत्रात रानातल्या कविता, तिसऱ्या सत्रात कवि संमेलन व चौथ्या सत्रात अध्यक्षीय भाषण होणार आहे. संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचा परिचय पुढीलप्रमाणे-
प्रा. डॉ. द. तु. पाटील
प्रा. द. तु. पाटील हे मूळचे बेळगावमधील असून द. म. शि. मंडळाच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए.एम.फील. व पीएचडी असे आहे. त्यांची ‘चैत्र’ ही ग्रामीण कादंबरी प्रसिद्ध असून या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मौज, नव-अनुष्टुभ, मुक्त शब्द, वसा, रसिक या त्यांच्या कथा प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
एम. एन. राजगोळकर
एम. एन. राजगोळकर हे मूळचे बेळगावचे असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपले सीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या कर सल्लागार म्हणून सेवा देत आहेत. शिवाय विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. 23 व्या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात कथाकथन होणार आहे. त्यानंतर ‘रानातल्या कविता’ हा कार्यक्रम व नंतर कविसंमेलन होणार आहे. त्यानंतर विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. रसिकांनी संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.