अध्याय एकोणतिसावा
ज्याच्यामुळे औषधालासुद्धा दु:ख शिल्लक रहात नाही असे निजसुख ज्यांनी दिले त्यांचे उपकार मी आता कसे फेडू ह्याविचारांनी गोंधळून गेलेल्या उद्धवाने काहीही न बोलता भगवंतांना साष्टांग नमस्कार घातला आणि भगवंतांच्या चरणावर अतीव कृतज्ञतेने डोके टेकवले. भगवंतांनी त्याला उठवले व आत्यंतिक प्रेमाने जवळ बसवून अतिशय गोड आवाजात विचारले, उद्धवा, मी निजधामाला जाणार म्हणून कळल्यावर माझ्या वियोगाच्या कल्पनेने तुला अत्यंत दु:ख झाले होते परंतु वियोगाचे दु:ख करण्यात अर्थ नाही हे मी तुला आत्मतत्वाच्या आत्तापर्यंत केलेल्या विवेचनातून समजावून सांगितले. त्यामुळे मी निजधामाला जाणार ह्या कल्पनेने तुला झालेले दु:ख आणि माझ्या सहवासाचा मोह ह्या दोन्ही गोष्टी कमी झाल्या की नाही ते सांग. भगवंतांचा प्रश्न ऐकून उद्धव चकित झाला. भगवंतांनी केलेली विचारपूस पाहून त्यांना आपल्याबद्दल किती प्रेम वाटत आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याबद्दल त्याला वाटणारा आदर कैकपटीने वाढला. श्रीचरणांना वंदन करून दोन्ही हात जोडून तो उभा राहिला. त्याला गहिवरून आले. स्वत:ला सावरून भगवंतांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे म्हणून तो भगवंतांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. भगवंतांचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होता. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे सेवन करून चकोर तृप्तीची ढेकर देतो त्याप्रमाणे भगवंतांचे मुखकमल पाहून उद्धव अतिशय समाधान पावला. भगवंताच्या प्रश्नाचे उत्तर आता त्याला द्यायचे होते. सकलदेवचूडामणी, यादवात अग्रगणी, अज्ञानाचा नाश करणारा, ब्रह्मवेत्त्यात शिरोमणी अशा श्रीकृष्णाशी तो स्वानंदाच्या भरात उस्फूर्ततेने बोलू लागला. अत्यंत आनंदाने तो श्रीहरिची स्तुती करू लागला. तो म्हणाला, मी अविद्येच्या महारात्रीत अडकलो होतो, मोहाच्या अंधाराने ग्रासलो होतो पण तुझ्या सूर्यासारख्या तेजस्वी वचनांनी माझ्या शोक, मोह आणि अज्ञानाच्या अंधाराचा नाश झाला. खरोखरच हा चमत्कार आहे आणि तो केवळ तुझ्यामुळेच घडला. अज्ञानाच्या रात्रीचा काळोख अतिशय घनघोर होता त्यातही थंडीने कहर केला होता पण त्यांना आत्मज्ञानाच्या अग्नीच्या उष्णता व प्रकाशाने अक्षरश: झटपट पळवून लावले. त्या अग्नीने थंडी आणि अंधार ह्यामुळे जी भयाची बाधा झाली होती ती आता नष्ट झाली असून, गोविंदा तुझ्या सान्निध्यात येथून पुढे भय कधीच वाटणार नाही. शोक मोह आणि स्वत:च्या देशाविषयी वाटणाऱ्या ममतेमुळे माया लोकांना प्रपंचाशी बांधून ठेवते परंतु तुझ्या सहवासात ती आपोआपच नाहीशी होते. जन्ममरणाचे अपार दु:ख ज्याने अनेकवेळा सोसले आहे तो तुझ्या सान्निध्यात आला की, त्याचे भवभय समूळ नष्ट होते. आता हे भवाचे भय समूळ नष्ट कसे होते ते उद्धव उलगडून सांगत आहे. उद्धवाची आत्मतत्वाची समज आणि बोलण्याची भाषा भगवंतानी त्याला केलेल्या उपदेशामुळे त्यांच्याच तोडीची झाली होती. तो म्हणाला, देवा, तुझ्या केवळ सान्निध्याने अज्ञानाचा समूळ नाश होतो. तेव्हा तुझे सानिध्य असणे हे अत्यंत आवश्यक आहे हे सात्विक भक्त जाणतात. त्यामुळे ते केवळ तुझीच पूजा करतात. आता इतरांची गोष्ट कशाला बोलू, मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभवच सांगतो. मी म्हणजे हा देह आणि समोर दिसणारे जग खरे आहे ह्या दोन गैरसमजुतीतून निर्माण होणाऱ्या अज्ञानाचे निरसन होण्यासाठी सत्संगाची अत्यंत गरज आहे.
सत्संगामध्येही उत्तम काय, तर तुमची संगती, तुमचा सहवास अतिपावन आहे. माझे निमित्त करून दीनजनांचा उद्धार व्हावा हे अत्यंत कळकळीने तुम्हाला वाटते आणि त्यासाठीच हे गुढाहून गूढ असलेले निजात्मज्ञान तुम्ही प्रकाशात आणले. त्यांचे अज्ञान नष्ट व्हावे म्हणून तुम्ही हा ज्ञानदीप पूर्ण क्षमतेने प्रज्वलित केलात.
क्रमश: