एचएस प्रणॉय, अर्जुन-धुव कपिला यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ टोकियो
सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने नवा इतिहास निर्माण करताना येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले. भारताच्या पुरुष दुहेरीच्या जोडीने मिळविलेले हे पहिलेच तर एकंदर दुसरे पदक आहे. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयची घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत रोखली गेली. चीनच्या झाओ जुन पेंगकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला तर एमआर अर्जुन व धुव कपिला यांचे आव्हानही संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया सात्विक-चिराग यांनी स्थानिक फेव्हरिट व विद्यमान विजेते तसेच द्वितीय मानांकित जपानच्या ताकुरो होकी व युगो कोबायाशी यांना उपांत्यपूर्व फेरीत 24-22, 15-21, 21-14 असा पराभवाचा धक्का देत पदकाच्या फेरीत स्थान मिळविले. अतिशय चुरशीची ठरलेली ही लढत एक तास 15 मिनिटे रंगली होती. पुरुष दुहेरीत भारतासाठी हे पहिलेच पदक आहे. याआधी महिला दुहेरीत 2011 मध्ये झालेल्या स्पर्धेत ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी कांस्यपदक मिळविले होते.
भारताने आतापर्यंत मिळविलेले हे 13 वे पदक असून पीव्ही सिंधूने एक सुवर्णपदकासह 5, सायना नेहवालने दोन (रौप्य व कांस्य), किदाम्बी श्रीकांतने एक रौप्य, लक्ष्य सेनने एक कांस्य, बी.साई प्रणीतने एक कांस्य, प्रकाश पदुकोनने एक कांस्यपदक मिळविले आहे. किमान कांस्यपदक निश्चित झालेल्या सात्विक-चिरागची उपांत्य लढत मलेशियाच्या सहाव्या मानांकित ऍरोन चिया व सोह वू यिक यांच्याशी होणार आहे.
प्रणॉयची निराशा
एकेरीत एचएस प्रणॉयकडूनही अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात होती. पण चीनच्या झाओ जुन पेंगने भारतीयांचा हार्टब्रेक करताना प्रणॉयचे पदक मिळविण्याचे स्वप्न 19-21, 21-6, 21-18 असे धुळीस मिळविले. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱया प्रणॉयने पहिला गेम जिंकून आशा निर्माण केली होती. पण ही आघाडी त्याला नंतर टिकविता आली नाही. झाओने त्याला नंतरच्या दोन गेममध्ये नमवित आगेकूच केली. निर्णायक गेममध्ये ब्रेकवेळी प्रणॉयने 11-10 अशी किंचित आघाडी घेतली होती. पण ती पुढे त्याला राखता आली नाही. प्रणॉयने आधीच्या फेऱयांत केंटो मोमोटा, लक्ष्य सेन यांना पराभवाचा धक्का दिला होता.
अर्जुन-कपिलाचाही पराभव
पुरुष दुहेरीची आणखी एक जोडी एमआर अर्जुन व धुव कपिला यांनाही पराभव पत्करावा लागल्याने पदकापासून वंचित व्हावे लागले. तीन वेळा सुवर्णपदक मिळविलेल्या जागतिक तिसऱया मानांकित मोहम्मद एहसान-हेंद्रा सेतियावान यांच्याकडून त्यांना 8-21, 14-21 असा केवळ 30 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. दुसऱया फेरीत भारतीय जोडीने आठव्या मानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला होता.