तुरुंगाच्या स्वच्छतागृहात कोसळल्याने जखमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मंगळवारी दिल्लीतील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सत्येंद्र जैन हे 25 मे रोजी तिहार तुरुंगातील स्वच्छतागृहात चक्कर येऊन कोसळले होते, यामुळे त्यांना जखम झाली होती. प्रथम त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मागील दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
डोक्याला झालेल्या जखमेमुळे ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मागील वर्षाच्या मे महिन्यापासून तुरुंगात कैद होते. ईडीने आम आदमी पक्षाच्या या नेत्याला अटक केली होती. जैन यांना सध्या न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.