प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सावर्डे भाजपा मंडळातर्फे कुळे-शिगांव व मोले पंचायत क्षेत्रातील विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मेटावाडा-कुळे येथील श्री राक्षस मळीकेश्वर मंदिराच्या सभागृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
गेल्या आठ वर्षात केंद्रातील मोदी सरकारने अनेक महत्वाच्या कल्याणकारी योजना राबविल्या असून धडाडीचे निर्णय घेतले आहेत. काँग्रेस सरकारला जे जमले नाही ते मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात करुन दाखविले. सावर्डे मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी आमदार डॉ. गणेश गावकर विशेष प्रयत्न करीत असून निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने देण्यात आली होती, ती येत्या चार वर्षात पूर्ण केली जातील, असे सावर्डे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी बोलताना सांगितले.
व्यासपीठावर धारबांदोडा जि. पं. सदस्य सुधा गावकर, कुळेचे सरपंच मच्छिंद्र देसाई, पंचसदस्य लक्सो डोईफोडे, कालेचे सरपंच किशोर देसाई, मोलेचे पंचसदस्य बाबू शेळके, स्नेहलता नाईक, रामकृष्ण गावकर, दाभाळ पंचायतीचे पंचसदस्य मोहन गावकर हे उपस्थित होते. यावेळी कुळे पंचायत क्षेत्रातील निवृत्त शिक्षक यशवंत वेरेकर, सुरंगा मडकईकर, शेतकरी प्रकाश देसाई, लाईनमन रत्नाकर वेळीप, डॉ. अनुजा म्हार्दोळकर, डॉ. सायली मामलेकर, आयुर्वेदिक डॉ. साईशा गांजेकर तर मोले पंचायत क्षेत्रातील निवृत्त शिक्षिका वैशाली खांडेपारकर, साहित्यिक रामनाथ गावडे, आयआयटीएन कृष्णा झोरे, राम सांगोडकर, कु. ऋतुजा शेट वेरेकर, यशवंत गावकर, शेतकरी रमेश गावकर, भोमी लांबोर आणि बाबली पर्येकर यांचा मान्यवरांच्याहस्ते शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत अवर लेडी ऑफ पायटी हायस्कूलमधून प्रथम आलेली कु. वैभवी आडाळकर, शिगाव सरकारी हायस्कूलमधून प्रथम आलेला कु. वेदांत संदीप वेळीप, क्रीडापटू रोयाना फर्नांडिस यांना गौरविण्यात आले. मच्छिंद्र देसाई यांनी स्वागत केले. पंचसदस्य नंदीश देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर रामकृष्ण गावकर यांनी आभार मानले.