सावंतवाडी प्रतिनिधी
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची माहिती
गणेश चतुर्थी उत्सव कालावधीत सावंतवाडी बाजारपेठेत तीन ठिकाणी तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये गणेश चतुर्थीतील माठी सामान विकण्यासाठी बाजार भरणार आहे. गणेशोत्सव कालावधीत सावंतवाडी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये , यासाठी सर्व वाहनांना पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीतील बाजारपेठेचे नियोजन चोख पद्धतीने करण्यात आले आहे. यंदा सावंतवाडी नगरपालिकेतर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव सोहळा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणपती उत्सव तसेच डिजिटल रिलीज स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे . गणपती विसर्जनासाठी सावंतवाडी मोती तलावात तीन बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणेश विसर्जनासाठी सावंतवाडी शहरात आठ ठिकाणी गणेश विसर्जनच्या जागांची स्वच्छता तसेच सर्व प्रभागातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बाजारपेठेत व सावंतवाडी शहरातील गणेशोत्सव कालावधीत वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरणला अलर्ट करण्यात आले आहे. या संदर्भात आज पालिका प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. अशी माहिती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी स्पष्ट केले.