टपाल मास्तर नारायण चंद्रकांत भगे याला अटक
पेडणे : मोरजी टपाल कार्यालयात टपाल मास्तर म्हणून कामावर असलेल्या तळवणे सावंतवाडी येथील नारायण चंद्रकांत भगे याने पोस्ट खात्यात जमा करण्यासाठी विविध ग्राहकांनी दिलेल्या तब्बल 8,37,050 ऊपयांची अफरातफर केली आहे. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद कऊन अटक केली आहे. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरजी टपाल कार्यालयात नारायण चंद्रकांत भगे हा टपाल मास्तर म्हणून कामाला होता. 1 ऑगस्ट 2021 ते 7 फेब्रुवारी 2023 या काळात ग्राहकांनी आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी त्याच्याकडे दिलेले पैसे त्यांच्या खात्यावर न जमा करता परस्पर आपणास वापरले. एक ग्राहक आपले खाते अद्ययावत करण्यासाठी म्हापसा कार्यालयात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. म्हापसा टपाल कार्यालयाने पेडणे पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पेडणे पोलिसांनी भगे याचा शोध घेतला. नारायण भगे गायब झाला होता. पोलिसांनी मोरजी टपाल कार्यालयामधील पोस्टमनच्या मदतीने विविध माध्यमांचा आधार घेत तपास केला. बुधवारी सकाळी नयबाग येथे नारायण भगे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्यावर भादंसंच्या कलम 409, 420 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल प्रेमनाथ सावळ देसाई, प्रमोद मयेकर, सागर खोरजुवेकर, हरिश्चंद्र पालयेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.