शाळा आठवड्याने पुढे नेण्याची पालकांची मागणी
पणजी : नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 हे काल सोमवारपासून सुरू होऊन शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या. मात्र उकाड्याने हैराण झालेल्या पालकांनी पाऊस नसल्याने शाळा एका आठवड्याने पुढे ढकलण्याची मागणी पुढे रेटली आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे विद्यालये सुरू होण्याच्या आसपास कमी, अधिक प्रमाणात पाऊस सुरू व्हायचा, परंतु यंदा पावसाने वाकुल्या दाखवल्या आहेत. सकाळी विद्यालयांत जाताना ऊन लागत नसले तरी उकाड्याने घामाघूम व्हायला होते. दुपारी मात्र कडक उन्हातून पालकांना आपल्या मुलांना घरी न्यावे लागते, अशी सध्याची परिस्थिती आहे.
घामाने भिजतो गणवेश
मुले घामाघूम होतात आणि त्याच घामाने भिजलेल्या गणवेशात त्यांना वर्गात दुपारपर्यंत म्हणजे शाळा सुटेपर्यंत रहावे लागते. अनेक शाळेत पंखे नाहीत आणि जे आहेत ते अपुरे आहेत. त्यांचा वारा मुलांना पुरेसा मिळत नाही. त्यामुळे मुलांना उकाड्याचा मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत
काल पहिल्या दिवशी मुलांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करुन, त्यांच्यावर फुलांचा वर्षावर करुन त्यांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी, शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. मुलांना जुने-नवे मित्र भेटले तसेच जुन्या-नव्या शिक्षकांचाही परिचय झाला. नवा गणवेश, नवी पुस्तके, वह्या यामुळे मुले आनंदात होती, तरीही उकाड्याने हैराण झाल्याचे दिसून आले. शाळेच्या आवारात पालक, मुले यांच्या गर्दीने वातावरण उत्साही बनले होते. इतके दिवस ते आवार मुले, पालक यांची वर्दळ नसल्याने शांत शांत होते. आता ते पुन्हा गजबजू लागले आहे. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या असून मुलांना-पालकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.