प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातही कोरोनाची (corona) चौथी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, नियोजनाप्रमाणे 16 मे पासूनच शाळा सुरू होतील. शाळा बंद ठेवण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश (B C Nagesh) यांनी दिले.
बेंगळूरमध्ये (bengalore) पत्रकारांशी ते बोलत होते. जून किंवा जुलै महिन्यात राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे झालेल्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून 16 मे पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्या दिवसापासूनच पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनासंबंधी सरकार, आरोग्य खाते आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनांचे पालन करण्यात येईल. कोरोनाच्या तिसऱया लाटेवेळीही वर्ग भरविण्यात आले आहेत. या अनुभवाच्या आधारे सर्व प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना करून शाळांचे कामकाज चालविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.
बेंगळूरमधील क्लॉरेन्स स्कूलला नोटीस
बेंगळूरमधील क्लॉरेन्स शाळेने बायबल शिकणे सक्तीचे करणे हे कर्नाटक शिक्षण कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे या शाळेला नोटीस बजावण्याची सूचना अधिकाऱयांना दिली आहे. ही शाळा केंद्र सरकारच्या सीबीएसई मंडळाच्या अंतर्गत येत असली तरी राज्याच्या शिक्षण कायद्यानुसारच चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे या शाळेला नोटीस देऊन त्यावर उत्तर आल्यानंतरच कोणती कारवाई करावी, याबाबतची शिफारस सीबीएसई मंडळाला करण्यात येईल, असे मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.