भैय्यासाहेब ओंकारांनी याचं वर्णन फार सुंदर करून ठेवले आहे. वेरूळची लेणी तीनशे वर्षे लागली खोदायला पण त्यामुळे एका कलाकाराचे काम त्याच्या पुढच्या पिढीने करायचा असा एक अलिखित नियम झाला आणि म्हणूनच कोणतेही काम हे एकाचं नसतं आणि म्हणूनच ते कुणाच्या नावावरही नसतंच. याची प्रचिती या लेण्यांमध्ये येते. इथल्या लेण्यांवरती कोणत्याही कलाकाराचे नाव नोंदवलेलं नाही हे भगीरथासारखं काम आहे. त्याआधी अनेक लोकांनी परिश्रम केलेले होतेच तसेच या शिल्पकारांचेदेखील. या सगळ्या शिल्पांमधून सुंदर कोरीव लेणी होताना, समाजाने काय काय दिलं असेल किंवा त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी किती पैसा ओतला असेल याची कुठेही नोंद केलेली नाही. म्हणूनच भारत म्हणजे भारताची संस्कृती ह्या शिल्पांवरती संस्कारित झालेली दिसते. इथली शिल्प कलाकृती लेणी किंवा गुंफा चित्रे वेरूळ अजंठा खजुराहो कोणार्क आणि असंख्य मंदिरात या ठिकाणी आजही आपल्यासमोर उभी आहे. या परंपरा प्राचीन काळापासून आज आमच्यापर्यंत पोहोचल्या त्या काळच्या साहित्यिकांनी केलेले शिल्पाचे नमुने आम्हाला अभिमानाने आजही मिळवावेसे वाटतात. यातच त्या कलेची श्रेष्ठता आली आणि म्हणूनच आम्ही आता जे काही घडवतोय किंवा बिघडवतोय त्यावरून आम्ही आमचं परीक्षण करायला हवंय. या आत्मपरीक्षणातून लक्षात येईल की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला नेमकं काय देणार आहोत. अनेकांच्या घरात गड किल्ल्यांचे पळवून नेलेले अवशेष किंवा लाकडाच्या कमानी पाहायला मिळतात. आपण आपल्या भव्य संस्कृतीचा वारसा घेऊन आलोय तोच वारसा जसाच्या तसा पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. भव्य कलाकृती शाश्वत शिल्पकला चित्र संगीत यातलं काहीतरी आम्ही निर्माण करतोय का असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. याच उद्देशाने सुरू झालेली संस्कार भारती ही कला जोपासण्यासाठी उत्तम हातभार लावते. आम्ही स्वत:ला मोठे बनायच्या नादात आमच्या संस्कृतीला छोटं करत निघालो. जे आमच्याकडे आहे तेसुद्धा आम्ही कधी अजून डोळे भरून पाहिलेलं नाही. आम्ही फक्त गड किल्ल्यांवर किंवा वारसा स्थळांच्या इथे गेल्यानंतर स्वत:ची नाव लिहून किंवा वेड्यावाकड्या आकृती काढून आम्ही त्या विद्रूप करायला निघतो. ते थांबवलं तरी आमच्या या संस्कृतीला फार मोठा हातभार लागेल. लेणी ही वरून खाली खोदायची असते. आधी कळस मग पाया या उक्तीप्रमाणे आणि ह्याला अनेक वर्षानुवर्ष थांबायला लागतं. काम करायला लागतं. जे आजच्या पिढीमध्ये अभावानेच आढळतं. आम्हाला साधी एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आम्ही सतत उतावीळ झालेलो असतो. अशा लोकांच्या हातून इतकी उत्तम कलाकारी घडणं शक्य नाही. आमची अवस्था त्या गोष्टीतल्या एका भिकाऱ्यासारखी झाली आहे. एक भिकारी रस्त्याने ओरडत निघाला होता. देवाने मला काहीच दिलं नाही. मला माझ्यावरती त्याची अवकृपा दिसते हे सगळं ऐकल्यानंतर त्या गावच्या राजाने या भिकाऱ्याला बोलावलं आणि सांगितलं की तुला काहीच मिळालं नाही हे तू सांगतोयस त्यामुळे मी तुला मदत करण्याचं ठरवलंय. मी तुला घरदार देतो, त्याच्या बदल्यात तुझा पाय दे. पैसे देतो त्याच्या बदल्यात हात दे. सोनं नाणं देतो त्याच्या बदल्यात तुझे डोळे दे. हे ऐकल्यावर मात्र भिकाऱ्याला कळायला लागलं की देवाने मला धडधाकट जन्म दिलाय त्याचं सोनं करायच्याऐवजी मी देवालाच दोष देत निघालो, हे बरोबर नाही आणि मग त्याची चूक त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण देवाच्या ह्या विश्वनिर्मितीलाच प्रणाम केला. त्याच्या हातून एक सुंदर कला निर्माण झाली. अशाच प्रकारच्या कलेचं प्रतीक असलेली कलाकृती आमच्या इथे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आकाशाचे छप्पर, दिशांचे खांब असलेली बाहुबलीची मूर्ती आम्हाला हेच तत्व शिकवून जाते. शिल्प निर्मिती करणारा महाराष्ट्र जागतिक पातळीवर मोठा होण्याचे कारण म्हणजे ही शिल्पकला. ही जशी संतांची भूमी आहे तशी कलावंतांचीदेखील भूमी आहे. पुण्यप्राप्तीसाठी आम्ही ठराविक देवळात जातो तसं आम्ही ठराविक ठिकाणी असलेल्या लेण्या बघायला का जात नाही? असा प्रश्न आम्हाला पडायला हवा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ह्या लेण्या आपलं वैभव घेऊन तुमच्या आमच्यासाठी तिष्ठत उभे आहेत. एरंडोल येथील बकासुराचा वध झाला ते पद्मालयदेखील बघण्यासारखं आहे.
क्रमश: