क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात एसडीएम क्रिकेट अकादमी धारवाड ब ने अमृत पोतदार सीसीए संघाचा 4 धावांनी, युनियन जिमखाना संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 5 गडय़ाने तर हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 10 गडय़ाने पराभव करत प्रत्येकी 2 गुण मिळविले. रोहितकुमार ए. सी. याने 17 धावात 6 गडी बाद करुन सामनावीर पुरस्कार मिळविला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एसडीएम क्रिकेट अकादमी ब संघाने 45.3 षटकात सर्व बाद 237 धावा केल्या. दुश्यंतने 40, सुदर्शने 37, आदित्य हिरेमठने 36, परिक्षितने 25 तर सुनिल कोरीने 23 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीएतर्फे नागराजने 3 तर वैभव कुरीबागी व पुरुषोत्तम जखंबाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोतदार सीसीएचा डाव 48.3 षटकात 233 धावात आटोपला. स्वप्निल येळवेने 61, स्वयंम अप्पन्नावरने 46, वैभव कुरीबागीने 33 धावा केल्या. एसडीएमतर्फे शाबास जमखंडीने 3, हबीब ताडपत्रीने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने 41.2 षटकात सर्व बाद 209 धावा केल्या. आदर्श माळीने 78, आर्यन कुदंपने 37, काविश मुक्कन्नावरने 21 तर दर्शन मयेकरने 20 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे शिवानंद पाटील 3, साईराज साळुंखेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 44.1 षटकात 5 बाद 212 धावा करुन सामना 5 गडय़ानी जिंकला. वैष्णव संघमित्रने नाबाद 79, गौसपिरहाजीने नाबाद 63 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे प्रथम मास्तमर्डीने 2 गडी बाद केले.
बेळगावच्या केएससीए स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने 35.4 षटकात सर्व बाद 123 धावा केल्या. विजयकुमार पाटील व रोहन कदम यांनी प्रत्येकी 41, वेंकटेश शिराळकरने 21 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे रोहितकुमार ए. सी. ने 17 धावात 6 गडी बाद करुन निम्याहून अधिक संघ बाद केला. त्याला आदर्श प्रकाशने 3 गडी बाद करुन सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 19.2 षटकात बिनबाद 124 धावा करुन सामना 10 गडय़ानी जिंकला. सुदन्वा कुलकर्णीने नाबाद 86 तर चिराग नाईकने नाबाद 35 धावा केल्या. या जोडीने पहिल्या गडय़ासाठी नाबाद 124 धावांची भागिदारी केली.