ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय हद्दीत कुरापती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात स्फोटकं लावलेला पाकिस्तानी ड्रोन घिरटय़ा घालत होता. सतर्क जवानांनी या ड्रोनची शहानिशा करुन तो तात्काळ खाली पाडला. त्यामुळे पाकचा घातपाताचा डाव उधळला गेला.
कठुआच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तल्ली हरिया चाक भागात हा ड्रोन आकाशात घिरटय़ा घालत होता. सुरक्षा दलांना या ड्रोनबाबत संशय आल्याने त्यांनी गोळीबार करून हा ड्रोन पाडला. ड्रोन पाडल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं त्याची कसून तपासणी केली. तपासणीत या ड्रोनला 7 अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर आणि 7 स्टिकी बॉम्ब लावल्याचे समोर आले. ही सर्व स्फोटकं जप्त करून ड्रोन उद्धवस्त करण्यात आला. त्यामुळे पाकचा घातपाताचा डाव उधळला गेला.