पंजाबमधील मान सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ पतियाळा
पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटविली आहे. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पतियाळा येथील सिद्धू यांच्या निवासस्थानी तैनात चारही पोलीस कर्मचाऱयांना परत बोलाविले आहे. सिद्धू यांच्या निवासस्थानाची सुरक्षा का हटविण्यात आली याची माहिती देण्यास कुठलाच पोलीस अधिकारी तयार नाही. पतियाळा जिल्हय़ातील पोलीस अधिकाऱयांनी याप्रकरणी मौन बाळगले आहे. नवज्योत सिंह सिद्धू हे 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी पतियाळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या प्रकरणी त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. तुरुंगात जाण्यापूर्वी सिद्धू यांना झेड सुरक्षा प्राप्त होती. सिद्धू हे तुरुंगात गेल्यावर सुरक्षेतील काही जवान हटविण्यात आले होते. तर काही जवानांना अमृतसर-पतियाळा येथील निवासस्थानी तैनात करण्यात आले होते. सिद्धू यांना शिक्षेतून सूट मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु पंजाब सरकारने अन्य काही कैद्यांना शिक्षेतून सूट दिली होती, पण सिद्धू यांचा यात समावेश नव्हता.