वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा जवळ आली की आजी-माजी क्रिकेटपटू स्पर्धा आणि सक्रिय खेळाडूंविषयी भविष्यवाणी करायला सुरुवात करतात. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिसने आगामी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा जोस बटलर सर्वाधिक धावा करणार अशी भविष्यवाणी केली होती. यामध्ये आता भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे सेहवागने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल भविष्यवाणी केली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. तसेच, तो संघासाठी बदल घडवून आणेल, असा दावा सेहवागने केला आहे.
आयसीसीशी बोलताना सेहवाग म्हणाला की, भारतातील फलंदाजीला अनुकूल असलेल्या परिस्थितीमुळे वर्ल्डकपदरम्यान सलामीवीरांना चमकण्याची संधी मिळेल. मला वाटते की, बरेच सलामी फलंदाज आहेत. पण मला एकाला निवडायचे तर तो रोहित शर्मा. विश्वचषक स्पर्धेत अनेकदा रोहित सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला आहे. जेव्हाही विश्वचषक स्पर्धा येते तेव्हा रोहितच्या कामगिरीत अमुलाग्र बदल होतो. त्याचे प्रदर्शन नक्कीच दर्जेदार होते. यामुळे मला विश्वास आहे की, तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बदल घडवून आणेल आणि खूप जास्त धावा करेल.
रोहितने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रोहितने तब्बल पाच शतके झळकावली होती. 9 सामन्यात त्याने 648 धावा केल्या आणि भारताला स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. यंदाच्या वर्षातही त्याने आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्या 16 सामन्यात 923 धावा केल्या आहेत. यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहितकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा असणार असल्याचे सेहवाग यावेळी म्हणाला. दरम्यान, यंदाचा वर्ल्डकप भारतामध्ये असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. अर्थातच, टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणं अवघड असणार आहे.
चौथ्या स्थानासाठी एबीने सुचवला पर्याय
नवी दिल्ली : आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी भारतीय संघासमोर चौथ्या क्रमांकाची समस्या कायम आहे. या क्रमांकावर कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने महत्वपूर्ण विधान केले आहे. आशिया चषक आणि विश्वचषकादरम्यान विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे कारण तो त्या स्थानावर सर्व प्रकारच्या भूमिका बजावू शकतो.
विराट सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आलेला आहे. त्याचा हा क्रमांक जवळपास निश्चित असतो. विराटने यापूर्वी 2011 वनडे विश्वचषकात भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. सध्या चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी भारताकडे श्रेयस अय्यर, केएल राहुल, तिलक वर्मा व ईशन किशन असे सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. पण सध्या तरी चौथ्या स्थानासाठी माझ्या दृष्टीने विराट योग्य आहे. विराट या स्थानावर खेळेल की नाही हे मला माहीत नाही. मात्र, संघाला तुमच्याकडून काही हवे असेल तर तुम्ही पुढे येऊन ती जबाबदारी स्वीकारायला हवी, असे एबी म्हणाला.