14 रोजी मुंबई येथे होणार सादरीकरण ; गोव्याला पहिल्यांदाच राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवात मान
पेडणे : सांताक्रुज कलिना मुंबई येथे होणाऱ्या तेराव्या राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवात नवचेतना युवक संघ पेडणे निर्मित सावरबेट या नाटकाची निवड झालेली आहे. हे नाटक 14 मार्च रोजी संध्या. 4 वा. मुंबई विद्यापीठ विद्यानगरी कॅम्पस, सांताक्रूझ मुंबई येथे सादर होणार आहे. हे नाटक प्रशांती माणगावकर यांनी लिहिले असून श्रीनिवास उसगावकर व सुशांत नायक यांनी दिग्दर्शित केलेले आहे. राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवात सादर होणारे हे गोव्यातील पहिले नाटक असल्याची माहिती पेडणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आमदार अध्यक्ष प्रवीण आर्लेकर, ज्येष्ठ नाट्याकर्मी देविदास आमोणकर, लेखिका प्रशांत माणगावकर, दिग्दर्शक श्रीनिवास उसगावकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर व मनोहर तळवणेकर उपस्थित होते.
कृष्णा पालयेकर यांनी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवात सादर होणारे गोवा राज्यातील हे पहिले नाटक असून त्याचा मान पेडणे तालुक्याला मिळालेला आहे. या नाटकात श्रीनिवास उसगावकर विनायक दामोदर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत आहेत तसेच अभिषेक नाईक, राज परब, शंकर नाईक, पुनीत तळवणेकर, कमलाकर परब, आर्या तेली, मनोहर तळवणेकर, कृष्णनाथ उसगावकर, सागर च्यारी, उद्देश पेडणेकर, गौरेश पेडणेकर, राहुल नाईक हे कलाकार सहभाग घेतील. तसेच प्रकाश योजना गौरक्षनाथ राणे, नेपथ्य/पार्श्वसंगीत: योगेश कापडी, वेशभुषा : महादेव गवंडी, रंगभूषा : एकनाथ नाईक, निर्मिती प्रमुख : देविदास आमोणकर, श्रीनिवास उसगांवकर, सूत्रधार कृष्णा पालयेकर, निवृत्ती शिरोडकर यांचा समावेश आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, पेडणेतील नवचेतना युवक संघ निर्मित सावरबेट हे नाटक मुंबई येथे वसंत नाट्या महोत्सवात सादर होणार आहे हे एकून आपल्याला आत्यानंद झालेला आहे. आमच्या पेडण्यात अनेक कलाकार आहेत आणि या कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम नवचेतना युवक संघाने केलेले आहे. या संस्थेने मुंबईत चांगला प्रयोग करून पेडणे तसेच गोवा राज्याचे नाव उज्वल करावे जेणेकरून गोवा राज्यातील आणि पेडण्यातील इतर कलाकारही या गोष्टीचा आदर्श घेऊन भविष्यात चांगल्या नाट्याकृतींसह रंगमंचावर आम्हाला पाहायला मिळतील. आपल्या या नाट्याप्रयोगाला शुभेच्छा असून त्यांनी या महोत्सवात आपला ठसा उमटून परत गोव्यात यावे, अशा शुभेच्छा प्रवीण आर्लेकर यांनी सर्व कलाकारांना दिल्या.