नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, व्हा. चेअरमन अनिल हुंदरे यांचा सत्कार
बेळगाव : नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांची दखल समाजाकडून नेहमीच घेतली जाते. प्रकाश अष्टेकर यांची नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी झालेली निवड ही त्याचेच प्रतीक आहे. त्यांच्या या निवडीने सामान्य कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे, असे प्रतिपादन श्री साईगणेश सोसायटीचे संस्थापक माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी केले. बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील श्री साईगणेश सहकारी सोसायटीच्यावतीने नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश अष्टेकर व व्हा. चेअरमन अनिल हुंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नेताजी जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन प्रदीप शट्टीबाचे होते. व्यासपीठावर नगरसेवक रवी साळुंके, मराठा निर्माण जागृती संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे, बेळगाव बेकर्स सहकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंगीरकर, प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर जाधव होते. चेअरमन प्रदीप शट्टीबाचे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व रोपटे देऊन प्रकाश अष्टेकर यांचा व यल्लाप्पा नागोजीचे यांच्या हस्ते अनिल हुंदरे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी उपमहापौर संजय शिंदे म्हणाले, नवहिंद सोसायटीने समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावला आहे. सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. बेकर्स सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजाराम सूर्यवंशी म्हणाले, नवहिंद सोसायटीचे पिग्मी संकलक ते हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या नवहिंद मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन असा अष्टेकरांचा प्रवास रोमांचक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नवहिंद सोसायटीची पताका आणखी उंचावेल, असा विश्वास वाटतो. गोपाळराव बिर्जे म्हणाले, स्पर्धात्मक युगातील नवहिंदने आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पी. जे. घाडी यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाला शोभा लाटुकर, वैशाली जाधव, सतीश शिंदे, बाळकृष्ण कंग्राळकर, मारुती भाकोजी, दत्ता आजरेकर, विश्वनाथ भाकोजी, भाऊ शिंदे, शाहू शिंदे, हिरालाल चव्हाण, राजेंद्र भातकांडे, सुनील सारंग उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीधर जाधव यांनी केले.