ऑल इंग्लंड चॅम्पियन चीनच्या ली शिंग फेंगवर केली मात, जेतेपदानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ टोरांटो
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने कॅनडा ओपनमध्ये विद्यमान ऑल इंग्लंड चॅम्पियन व चीनचा दिग्गज खेळाडू ली शी फेंगचा 21-18, 22-20 असा पराभव करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, ही स्पर्धा जिंकणारा लक्ष्य सेन दुसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. याआधी बीसाई प्रणितने 2016 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच लक्ष्य सेनने कारकिर्दीत दुसऱ्यांदा बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज 500 स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. याआधी त्याने 2022 मध्ये इंडिया ओपन सुपर सीरिज 500 स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. दुसरीकडे, महिला एकेरीत जपानची अव्वल खेळाडू अकाने यामागुची अजिंक्यपदाला गवसणी घातली.
कॅनडा ओपनमध्ये दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या लक्ष्यने स्पर्धेच्या सुरुवातीपासून सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारले. उपांत्य व अंतिम फेरीत तर त्याने अव्वलमानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे, कॅनडा ओपनची अंतिम लढतही चांगलीच चुरशीची झाली. लक्ष्यचा चिनी खेळाडू ली शी फेंगविरुद्ध हा सहावा सामना होता. अंतिम फेरीतील विजयानंतर लक्ष्यने फेंगविरुद्ध आपल्या विजयाचा रेकॉर्ड 4-2 असे केले आहे. कॅनडा ओपनमधील जेतेपदानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
लक्ष्यचा संघर्षपूर्ण विजय
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने जपानच्या 11 व्या मानांकित केंटा निशिमोटोचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. रविवारी रात्री लक्ष्यचा अंतिम सामना चीनच्या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या ली शी फेंगविरुद्ध झाला. 50 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने फेंगला 21-18, 22-20 असे नमवत जेतेपदाला गवसणी घातली. आक्रमक खेळणाऱ्या लक्ष्यने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 6-2 अशी आघाडी घेतली होती. पण, फेंगने देखील त्याला टक्कर देताना 13-13 व नंतर 16-16 अशी बरोबरी साधली. यानंतर लक्ष्यने नेटजवळ सलग चार गुणाची कमाई करत आपली आघाडी 20-16 अशी केली. लक्ष्यने दोन गुणाची कमाई करत हा गेम 21-18 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र उभय खेळाडूंत एकेका गुणांसाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. पहिला गेम गमावल्यानंतर फेंगने या गेममध्ये 4-0 अशी आघाडी घेतली होती. पण लक्ष्यनेही पुनरागमन करत 11-9 अशी निसटती आघाडी घेतली. यानंतर दोघांत 15-15, 18-18 व 20-20 अशी बरोबरी झाली होती. रोमांचक अशा या गेममध्ये अखेरीस लक्ष्यने नेटजवळ दोन गुणाची कमाई करत हा गेम 22-20 असा जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
महिला एकेरीत जपानच्या यामागुचीला विजेतेपद
दरम्यान, रविवारी महिला एकेरीचा सामना जपानची अकाने यामागुची व थायलंडची रेचनॉक इंटेनॉन यांच्यात झाला. या सामन्यात यामागुचीने बाजी मारताना 21-19, 21-16 असे पराभूत केले. यामागुचीने या सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी इंटेनॉनला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. हा सामना 43 मिनिटे चालला.