फुफ्फुसांशी संबंधित आजारावर सुरु होते उपचार
वृत्तसंस्था/ कोची
भाजप-संघ परिवाराचे वरिष्ठ नेते पी.पी. मुकुंदन यांचे बुधवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 77 वर्षांचे होते. मुकंदन यांनी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. मुकुंदन यांच्यावर फुफ्फुसांशी संबंधित आजारांमुळे उपचार सुरू होते. मुकुंदन यांनी केरळमध्ये दशकांपर्यंत संघ परिवारात काम करण्यासह भाजपचे नेतृत्व केले होते. 1966 ते 2007 म्हणजेच 41 वर्षापर्यंत ते संघाचे प्रचारक राहिले होते. कन्नूर जिल्ह्यातील कोट्टियूरमध्ये जन्मलेले मुकुंदन यांना आणीबाणीदरम्यान तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यावेळी ते त्रिशूर जिल्ह्यात संघ प्रचारक म्हणून काम करत होते. 1990 मध्ये ते भाजपचे राज्यातील संघटनात्मक महासचिव झाले होते. परंतु मागील काही काळापासून ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्याचे मंत्री अन् विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुकुंदन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.