बाजारात घसरणीनंतर परतली तेजी : निफ्टी 114 अंकांनी वधारला : एनटीपीसी, टाटा मोर्ट्स तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील मागील सत्रातील प्रभावीत झालेले बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक अंतिम दिवशी शुक्रवारच्या सत्रात वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक बाजारामधील सरकारात्मक वातावरणाचा परिणाम शुक्रवारी बाजारात झाल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 320 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 65,828.41 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 114.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,638.30 वर बंद झाला आहे. याचदरम्यान ग्लेनमार्क 10 टक्क्यांनी वधारला तर वेदान्ताचे समभाग 7 टक्क्यांसोबत तेजीत राहिले होते. एनटीपीसी आणि टाटा मोर्ट्स यांनी तेजी राखत बाजाराला आधार दिला. टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये मात्र 5 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
जागतिक बाजारांचा प्रभाव
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी अमेरिकन बाजारातील तेजीनंतर आशियातील बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग यांच्या सकारात्मक कामगिरीने भारतीय बाजारात उत्साह कायम राहिला होता. जागतिक तेल बाजारात ब्रेंट व्रूड 0.05 टक्क्यांनी वधारुन 95.45 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.
शेअर बाजारात 30 समभागांमध्ये सेन्सेक्समधील एनटीपीसी 3.26 टक्के, टाटा मोर्ट्स 2.77 यासह जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, सनफार्मा, भारती एअरटेल आणि आयटीसीचे समभाग हे मजबुतीसोबत बंद झाले आहेत. यासह इन्फोसिस, विप्रो, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, टाटा पंन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, पॉवरग्रिड कॉर्प, अॅक्सिस बँकेचे समभाग प्रभावीत झाले आहेत. फायनँशिअल सर्व्हिसेसचे समभाग 13.21 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. ग्लेनमार्क फार्मा 10.11 टक्क्यांनी वधारला आणि औमेक्स लिमिटेड 9.94 टक्क्यांनी तेजीत राहिला. यावेळी अशोका बिल्डकॉईन 9.09 टक्क्यांनी आणि वेदांताचे समभाग 6.81 टक्क्यांनी मजबूत तर अन्य कंपन्यांमध्ये नवीन फ्लोरीनचे समभाग हे 13 टक्क्यांनी घसरले आहेत.