सलगची दुसरी मजबूत तेजी ः चौफेर विक्रीचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारात दुसऱया दिवशीच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी आपल्या मजबूत स्थितीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 578 अंकांवर झेपावला होता. अमेरिका तसेच आशियातील बाजारांमध्ये झालेल्या चौफेर विक्रीच्या मदतीने बाजाराला समर्थन मिळत गेले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 578.51 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,719.74 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 194 अंकांच्या मजबूतीसोबत 1.10 टक्क्यांसोबत निर्देशांक 17,816.25 वर स्थिरावला आहे. काहीवेळ सेन्सेक्समध्ये 964.56 अंकांपर्यंतची उसळी राहिली हेती.
सेन्सेक्समध्ये सनफार्मा, डॉ.रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग प्रामुख्याने तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला नेस्ले इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आदींचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
निफ्टी मिडकॅप व स्मॉल कॅप निर्देशांक 1 टक्के इतका वाढला होता. यातही फार्मा निर्देशांक सुमारे 3 टक्के इतका वाढलेला दिसला. ऑटो व खासगी बँकांच्या निर्देशांकांनीही 1 टक्के वाढत बाजाराला चांगला आधार दिला. बँक निफ्टी निर्देशांकही मंगळवारी 1.4 टक्के तेजी राखून होता. आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभासह बंद झाले आहेत. युरोपीयन प्रमुख बाजारात सुरुवातीच्या कामगिरीत घसरणीचा कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.49 टक्क्यांनी वधारुन 92.45 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. अमेरिकेतील फेडरल बँकेचा व्याजदर वाढीचा निर्णय आज होत असून त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर कसा असेल हे बुधवारी पाहावे लागणार आहे.