वृत्तसंस्था/ ट्युरिन (इटली)
2023 च्या टेनिस हंगामातील अखेरची एटीपी फायनल्स पुरूषांची टेनिस स्पर्धा येथे झाली. या स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सिडेड 36 वर्षीय नोव्हॅक जोकोव्हिचने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील जोकोव्हिचचे हे सातवे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचने इटलीच्या जेनिक सिनेरचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत जेतेपदाला गवसनी घातली. जोकोव्हिचला 2023 चा टेनिस हंगाम मोठ्या प्रमाणात लाभदायक आणि यशस्वी ठरला आहे. या कालावधीत त्याने तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवित वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील विक्रमी 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याने एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत 40 वे विजेतेपद मिळविले आहे. या यशामुळे जोकोव्हिचने एटीपीच्या मानांकनात 400 आठवडे अग्रस्थान मिळविण्याचा विक्रमही केला आहे.
इटलीत झालेल्या या स्पर्धेतील पुरूष दुहेरीचे जेतेपद अमेरिकेचा राजीव रॅम आणि सॅलीसबेरी यांनी पटकाविले. पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रॅम आणि सॅलीसबेरी यांनी ग्रेनोलर्स आणि झेबालोस यांचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत जेतेपद स्वत:कडे राखले. 2023 च्या टेनिस हंगाम अखेरीस रॅम आणि सॅलीसबेरी या जोडीने सलग 10 सामने जिंकले आहेत.