बेळगाव-म्हैसूरमध्ये 4 लाखांच्या साड्या चोरल्या : तपासासाठी पोलीस आंध्रप्रदेशला रवाना
बेळगाव : कापड दुकानातील कामगारांचे लक्ष विचलित करून दीड लाखांच्या रेशमी साड्या पळविणाऱ्या सहा महिला व दोन पुरुष या आठ जणांच्या टोळीला सात दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बेळगाव पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रात्री पुढील तपासासाठी आंध्रप्रदेशमधील विजयवाडाला रवाना झाले आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंटूर व कृष्णा जिल्ह्यातील आठ जणांच्या टोळीला शिर्डीत अटक केली होती. त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी सर्व आठ जणांना चौदा दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली होती.
या मागणीवरून न्यायालयाने त्यांना सात दिवसांसाठी पोलीस कोठडी ठोठावली. खडेबाजार पोलिसांनी 1) इता सुनिता (वय 45) रा. ताडेपल्ली, जि. गुंटूर, 2) चाडला कनकदुर्गा (वय 36) रा. पोंडपल्ली, जि. कृष्णा, 3) मट्टपर्ती राणी (33) रा. ताडेपल्ली, जि. गुंटूर, 4) देवरकोंड मणी (वय 39) रा. साईनगर, यनमला कुडूरू, विजयवाडा ग्रामीण, जि. कृष्णा, 5) मेच्चारप्पु रजनी (वय 30) रा. कोंडपल्ले, इब्राहिमपट्टणनम, जि. कृष्णा, 6) पोन्न चुकम्मा (50) रा. कोंडपल्ले, इब्राहिमपट्टणनम, जि. कृष्णा, 7) कनमुरली वेंकटेश्वर राव (वय 41) रा. तिरुवुरू रोड, इब्राहिमपट्टणनम, जि. कृष्णा, 8) उसुरूगंटी वेंकटेश्वरलू (वय 34) रा. जगय्यापेठ, जि. कृष्णा अशी अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. या सर्व आठजणांना ताब्यात घेतले आहे.
दि. 3 नोव्हेंबर रोजी खडेबाजार येथील विरुपाक्षी सिल्क अँड सारीज या दुकानातील कामगारांचे लक्ष विचलित करून 1 लाख 40 हजार 700 रुपये किमतीच्या नऊ कांचीपुरम रेशमी साड्या पळविण्यात आल्या होत्या. याच टोळीने दुसऱ्याच दिवशी म्हैसूर येथील युवराज साडी सेंटरमधील कामगारांचे लक्ष विचलित करून अडीच लाखांच्या साड्या पळविल्या आहेत. बेळगाव व म्हैसूर येथे 3 लाख 90 हजार 700 रुपये किमतीच्या साड्या चोरून त्यांनी त्या आपल्या गावी पोहोचविल्या आहेत. साड्या ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक आंध्रप्रदेशला रवाना झाले आहे.