वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथील नंदनवनम कॉलनीत एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अबेद बिन खलीद, तहसीन, मंकला महेश, एम. नरसिंग, अश्रफ, फैझल आणि इम्रान अशी आरोपींची नावे आहेत.
बलात्कार पिडीतेला तिच्या चुलत भावांनी गुन्ह्याच्या स्थळी आणले होते. तिच्यासह तिच्या दोन भावांनाही येथे आणण्यात आले होते. यावेळी आरोपी अबेद याने या अल्पवयीन तरुणीकडे शारिरीक संबंधांची मागणी केली. ती तिने नाकारल्याने त्याने आपल्या अन्य मित्रांसह तिचे वास्तव्य असलेल्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन तिच्यावर सर्व आरोपींनी सामुहिक बलात्कार केला. ही घटना सोमवारी 21 ऑगस्टला घडली. या तरुणीने नंतर पोलिसांमध्ये तक्रार सादर केली. तिच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
सुरीचा धाक दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आला असे तिने तक्रारीत स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करुन 11 विशेष पथकांच्या साहाय्याने विविध ठिकाणी लपलेल्या आरोपींना अटक केली. सातपैकी तीन आरोपी या गुन्ह्याचे सूत्रधार आहेत. इतर चार आरोपींनी या तिघांना साहाय्य केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.