केरळमधील धक्कादायक घटना : डाव्या पक्षांचे सरकार लक्ष्य
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) विद्यार्थी नेता परीक्षेत सामील न होताच उत्तीर्ण झाला आहे. या नेत्याचे गुणपत्रक जारी झाल्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात नेमकं काय सुरू आहे अशी विचारणा केरळ काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी डाव्या पक्षांच्या सरकारला उद्देशून केली आहे.
एसएफआय ही केरळमध्ये डाव्या पक्षांच्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या माकपची विद्यार्थी शाखा आहे. एर्नाकुलम येथील महाविद्यालयात संबंधित धक्कादायक प्रकार घडला आहे. तेथील एसएफआय नेता पीएम अर्शो याचे एक उत्तीर्ण दर्शविणारे गुणपत्रक समोर आले आहे. अर्शोने प्रत्यक्षात कुठल्याच परीक्षेत भाग घेतला नव्हता.
ही घटना केरळमधील डाव्या पक्षांचे कुशासन दर्शविणारी आहे. एसएफआर केरळमध्ये कुठल्याही आव्हानाशिवाय महाविद्यालयातील निवडणूक जिंकते, त्याचे सदस्य परीक्षेत सहभागी न होता उत्तीर्ण होतात आणि नोकऱ्यांसाठी बनावट पदवी मिळवितात. केरळमधील हा प्रकार डाव्या पक्षांचे अपयश दर्शवित असल्याची टीका काँग्रेस नेते चेन्निथला यांनी केली आहे.