बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने (Sharukh Khan) आपल्या पठाण या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे जगप्रसिद्ध टाईम्स मासिकाच्य़ा (Times Magazin) यावर्षीच्या टाईम-100 (Time-100) या लिस्टमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. वाचकांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात आलेल्या या उपक्रमात अमेरिकेतील 12 लाखांहून अधिक लोकांनी आपली मते मांडली. या 12 लाखांपैकी 4 टक्के मते एकट्या शाहरूख खानला पडली असून त्याने विश्वचषक फुटबॉल विजेत्या अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीलासुद्धा (Leonel Messi) मागे टाकले आहे.
टाईम्स या जगप्रसिद्ध मासिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी जगभरात 1हजार कोटींहून जास्त व्यवसाय करणाऱ्या पठाण या चित्रपटामुळे शाहरूख खानला जगभरातील 100 प्रसिद्ध लोकांमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. शाहरूख खानला 12 लाखांपैकी एकूण 4 लाख मते पडली.
तर इराणमध्ये आपल्या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या महिलांना दुसऱ्या नंबरवर पसंती मिळाली आहे. या महिलांना एकूण 3 टक्के मते मिळाली असून त्या इराणमधील जुलमी राजवटीविरोधात आपल्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत आहेत. इराणमधील पोलीसांच्या हातून मारल्या गेलेल्य़ा 22-वर्षीय महसा अमीनीच्या मृत्युमुळे तिथल्या महिलांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला होता. त्यांना TIME- 2022 मध्ये वाचकांच्या पसंतीचा “हीरोज ऑफ द ईयर” तसेच ‘पर्सन ऑफ द ईयर’ हा पुरस्कारही मिळाला होता.
जगाला कोरोना महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याना तिसरे स्थान मिळाले आहे. त्यांना वाचकांनी 2 लाख मते दिली आहेत. एकट्या अमेरिकेत 18 दशलक्ष लोकांनी महामारीच्या काळात निःस्वार्थपणे रुग्णांची सेवा केली. तर ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल 1.9 टक्के मतांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
अर्जेंटिनाला गेल्या वर्षी कतार येथे झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी या यादीत 1.8 टक्के मतांसह पाचव्या स्थानावर आहे. आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या लिओनेल मेस्सीने याआधी फ्रेंच फुटबॉल मॅगझिनने दिलेला ‘बॅलन डी’ओर पुरस्कार’ सात वेळा जिंकलेला आहे.
त्यानंतर ऑस्कर विजेती मिशेल योह, माजी टेनिसपटू सेरेना विल्यम्स, मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचाही टाईम्सने आपल्या यादीत समावेश आहे.