‘एक देश, एक निवडणूक’ मुद्यावर विचारमंथन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ कोविंद हे ‘एक देश, एक निवडणूक’साठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. अमित शहा या समितीचे सदस्य असून अर्जुनराम मेघवाल हे विशेष सदस्य आहेत. समिती नियुक्त झाल्यानंतर अमित शहा आणि मेघवाल यांनी कोविंद यांची पहिल्यांदाच ही शिष्टाचार भेट घेतली आहे. बुधवारी सायंकाळी झालेली ही बैठक सुमारे तासभर चालली. तसेच कायदा मंत्रालय समितीच्या सदस्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार असून त्यासंबंधी संभाव्य नावांवर विचारविमर्ष करण्यात आला. समितीच्या पहिल्या बैठकीची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यासंबंधी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सर्व समिती सदस्यांची पहिली व्यापक बैठक हायब्रीड मोडमध्येही घेतली जाऊ शकते.
सरकारने 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. सरकार ‘एक देश, एक निवडणूक’ यावर सरकार विधेयक आणू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. याआधी कायदा मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. सध्याची कायदेशीर चौकट लक्षात घेऊन देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्याचे परीक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.