मंत्री जारकीहोळी-हेब्बाळकर यांची सूचना : पाणी समस्या, शाळा दुरुस्ती, बी-बियाणे वाटपासह विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : पावसाळा सुरू होत असल्याने बुधवारपासून शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचे वाटप करण्यात यावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. तर शाळा सुरू होत असल्याने सर्व शाळांना डेस्क व इतर फर्निचर वेळेवर द्या आणि प्राथमिक आरोग्य पेंद्रांच्या दुरुस्तीबाबत अहवाल तयार करा, अशा सूचना महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केल्या. जिल्ह्याच्या विकासकामांबाबत सुवर्णविधानसौध येथे मंगळवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ करावी लागते. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना ही धावपळ करणे अवघड असून त्यांच्यासाठी शक्य तितक्याजवळ बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सुरू करा, असेही सांगितले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी पाऊल उचलावे. आत्महत्येची नोंद होताच शवविच्छेदनाचा अहवाल घेऊन तातडीने त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूर तसेच नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही जनावराचा मृत्यू झाल्यास त्या मालकाच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी स्वत: नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई कशी मिळते, याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे स्वत:च अधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शाळांना आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे धोकादायक शाळांची तातडीने दुरुस्ती करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवा. बेळगावच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आवश्यक मशीनरी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमधील दारिद्र्या रेषेखालील कुटुंबांना रेशनकार्डे तातडीने द्यावीत. त्यांना रेशनही तातडीने उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी रेशन दुकाने दूरवर असल्यामुळे समस्या निर्माण होते. तेव्हा नव्याने रेशन दुकाने सुरू करावीत, अशी सूचनादेखील केली. जिल्ह्यातील पाणीपुरवठा प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. कोणत्याही अधिकाऱ्याने कामे करताना टाळाटाळ करू नये, सातत्याने देखरेख ठेवून ती कामे पूर्ण करावीत, कोठेही पाण्याची समस्या निर्माण होऊ नये याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आदेश मंत्री जारकीहोळी यांनी दिले आहेत. शहरामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये बऱ्याचवेळा व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे स्वतंत्र बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी सरकारच्या आदेशानुसार काम करावे. जनतेला चांगले प्रशासन देण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. अधिकाऱ्यांनी वेगाने काम करावे. अधिकाऱ्यांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी त्याबाबतची माहिती द्यावी, आम्ही निश्चितच त्यांना प्रोत्साहन देऊ, असे आश्वासनदेखील यावेळी दिले आहे.
अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे
सध्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांतील विद्यार्थ्यांना डेस्क व इतर फर्निचर उपलब्ध करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतेंची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. सांबरा येथे अतिरिक्त रेशन दुकान सुरू करावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अतिवृष्टीने पूर आल्यास जनतेला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आताच योग्य व्यवस्थापन करावे. बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, चंदनहोसूर या गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्याठिकाणी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. महत्त्वाचे म्हणजे जनतेने या सरकारकडे अधिक अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या दूर कराव्यात, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी म्हणाले, पीकेपीएस सोसायटीमधून बी-बियाणांचे वाटप करणे गरजेचे आहे. वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. बेळगाव येथील रेशीम विभागाचे सहसंचालक कार्यालय हावेरी जिल्ह्यात हलविण्यात आले आहे. ते पुन्हा बेळगावात आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, शेतकरी संपर्क केंद्रांसह 170 केंद्रांवर बी-बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णावर, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, अप्परजिल्हाधिकारी के. टी. शांतला आदी उपस्थित होते.
तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित नुकसानभरपाई द्या
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करणे, याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्या तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी. ठिंबक सिंचन योजनेचे लाभार्थी निवडताना संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पात्र लाभार्थ्यांना योजना लागू करावी. रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.