प्रतिनिधी /कुंकळ्ळी
वेरोडा, कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बहारदार संगीत कार्यक्रमाने उपस्थित रसिकजन सुखावले. यावेळी एकाहून एक सरस गीते सादर करून समृद्ध चोडणकर व नेहा कळसूलकर यांनी वाहवा मिळवली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व श्रावणी सोमवारची संधी साधून ‘स्वरयज्ञ’ हा देशभक्तीपर गीते, भावगीते, भक्तीगीते व अभंग यांचा समावेश असलेला कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
या कार्यक्रमाची निर्मिती तबलापटू व संगीतकार यतीन तळावलीकर यांनी केली होती. उत्सवाचे यजमान लोटलीकर बंधू व देवस्थान समितीने हा कार्यक्रम ठेवला होता. त्यात प्रदीप पंडित यांनी सूत्रनिवेदनाची जबाबदारी सांभाळली. ‘जय शारदे’ या स्तवनाने कार्यक्रमाची नेहा कळसूलकर यानी सुरुवात केली. नंतर ‘शुरा मी सरदार’, ‘जयोस्तुते’ व इतर देशभक्तीपर गीते तसेच साईबाबांवरील ‘भिक्षा वाढ बाई, त्याची पुण्याई’ हे गीत समृद्ध चोडणकर यांनी नवीन ढंगात सादर केले. तसेच अन्य गीतेही त्यांनी सुरेल आवाजात सादर केली.
‘चाफा बोलेना’, ‘शुक्र तारा मंदवारा’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘फुलले रे मन माझे फुलले रे’, ‘सखे मंद झाल्या तारका’ अशी अनेक सरस भावगीते नेहा कळसूलकर यांनी सादर केली. याशिवाय अभंग, भक्तीगीतांची जोड मिळाल्यामुळे कार्यक्रम अधिकच रंगला. विष्णू शिरोडकर सिथेसायझर, अवधुत च्यारी हँडसोनिक/ढोलक, प्रकाश आमोणकर ऑक्टोपेड यांनी संगीत साथ दिली, तर ध्वनियोजना अभिषेक फोंडेकर यांनी सांभाळली. सुरुवातीला वाहतूक अधिकारी संदीप देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष मारूती देसाई, पत्रकार सुनील फातर्पेकर व कमिटी पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन कलाकारांचे स्वागत केले.
अध्यक्ष गौरीश फडते देसाई यांनी उत्सवांसंबंधी माहिती दिली. यतीन तळावलीकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. हा तिसरा श्रावणी सोमवार सचिन रमेश लोटलीकर, आकें-मडगाव यांच्या कुटुंबियांतर्फे साजरा करण्यात आला. यानिमित्त देवीला सकाळी महाभिषेक, इतर धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी स्वरयज्ञ कार्यक्रम, पालखी मिरवणूक, आरत्या, प्रसाद व नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता झाली. भाविकांनी यावेळी मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, सोमवार उत्सवानिमित्त वेरोडातील मंदिरात घातलेल्या आणि श्री सरस्वती देवीची प्रतिमा साकारलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही रांगोळी गौतम उदेकर यांनी घातली होती. त्यांचा यतीन तळावलीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.