ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निवडणूक आयोगाने काल शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले. ठाकरे गटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात असतानाच आज उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एकाच कारमधून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
औरंगाबादमध्ये एका हॉटेलमध्ये शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे काही वेळीपूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. हे दोन्ही नेते एकाच गाडीतून औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने रवाना झाले. या प्रवासादरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिस्पर्धी पक्षातील अनेक राजकीय नेते एकत्र प्रवास करतात. मात्र, सध्या राज्यात अनेक राजकीय उलथापालथी सुरू असल्याने पवार आणि दानवेंचा एकत्रित प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे.
अधिक वाचा : आता नव्या नावावरही दोन्ही गटाचा दावा, पेच निर्माण होण्याची शक्यता
दरम्यान, शिवाजीराव पंडीत हे शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आज गेवराईत होणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. त्यासाठी ते गेवराईला रवाना झाले आहेत.