वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण कोरियात 3 ते 10 सप्टेंबर दरम्यान सुरू झालेल्या 2023 च्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय टेटे संघाचे नेतृत्व शरथ कमल आणि मनिका बात्रा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दक्षिण कोरियातील ही 26 वी खंडीय टेबल टेनिस स्पर्धा ही पात्रतेची राहिल.
दक्षिण कोरियातील या स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या सांघिक प्रकारातील विजेते तसेच मिश्र दुहेरीतील विजेते पुढील वर्षीच्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष, महिला एकेरी, पुरुष आणि महिला देहेरीत सामने खेळवले जातील. या स्पर्धेकरिता अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने 10 जणांचा संघ निवडला असून यामध्ये 5 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. 41 वर्षीय शरथ कमल पुरुष संघाचे नेतृत्व करेल. या संघामध्ये हरमित देसाईचा समावेश आहे. भारतीय महिला संघाचे नेतृत्व मनिका बात्राकडे राहिल. या संघामध्ये श्रीजा अकुलाचा समावेश आहे. मिश्र दुहेरीत मनिका बात्रा आणि जी. साथियान भारताचे प्रतिनिधीत्व करतील.