जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ रत्नागिरी
माजी मंत्री ऍड. अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दापोली तालुक्यातील मुरूड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे. हे वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. बांधकाम विभागाला हे रिसॉर्ट पाडण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांनी दिली.
जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटी आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक सोमवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱयांसोबत झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप करत ते पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल. हे रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार ही कारवाई होणार असे जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी सांगितले.