धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये टाळण्याची दिली सक्त ताकीद
प्रतिनिधी/ पणजी
धर्मगुरुंनी केवळ चर्चच्या शिकवणीचे पालन करावे, इतरांच्या धार्मिक भावनांशी खेळू नयेत, तशी वक्तव्ये किंवा कृतीही करू नयेत, अशा कडक शब्दात गोवा आणि दमणचे मुख्य बिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी राज्यातील धर्मगुऊंना सक्त ताकीद दिली आहे.
गत काही दिवसांपासून राज्यात अनेक धर्मगुरुंकडून चर्चमधील प्रवचनादरम्यान इतर धर्मियांच्या आणि खास करून हिंदू धर्मियांच्या देवीदेवता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आराध्य दैवतांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्यावरून नंतर राज्यभरात मोठे वादंग निर्माण होऊन फा. बॉल्मेक्स परेरा यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यापर्यंत प्रकरण पोहोचले होते. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता व नंतर त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.
सध्या निर्माण झालेल्या वादासाठी ताळगाव येथील चर्चमधील धर्मगुरु कारण ठरले असून त्यांची आगळीक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली असता त्यांनी असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी तर धार्मिक भावना दुखावणाऱ्यांना अटक केली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते.
दुसऱ्या बाजूने फर्नांडिस नामक एका ख्रिस्तीबांधवानेच कार्डिनल फेर्रांव यांना उद्देशून खुले पत्र लिहून अशाप्रकारे समाजात दुही पसरविणाऱ्या, धार्मिक व्यासपीठावरून राजकारण खेळणाऱ्या धर्मगुरुंचे कान पिळावे असा सल्ला दिला होता. तसेच सद्यस्थितीत देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक ताणतणावाच्या प्रकरणांमुळे आधीच दंगे आणि जाळपोळीच्या घटनांनी अस्थिरता माजलेली असताना धर्मगुरुंची अशी वक्तव्ये त्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, असा आरोपही फर्नांडिस यांनी केला होता.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांनी खेद व्यक्त केला असून भविष्यात सर्व ख्रिस्ती धर्मगुऊंनी आपल्या मर्यादा सांभाळाव्यात व इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा कडक शब्दात ताकीद दिली आहे.