वृत्तसंस्था/ शिलाँग
2023 च्या आय लीग फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात शिलाँग लाजाँग एफसी संघाने माजी विजेत्या गोकुळाम केरळ एफसीचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
या स्पर्धेत गेल्या चार सामन्यातील शिलाँगचा हा पहिला विजय आहे. तर चालू वर्षीच्या आय लीग हंगामातील गोकुळम केरळचा हा पहिला पराभव आहे. या पराभवामुळे गोकुळम केरळने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाच सामन्यातून 10 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत मोहमेडन स्पोर्टींगने पाच सामन्यातून 13 गुणासह आघाडीचे स्थान राखले आहे.
रविवारच्या सामन्यात शिलाँग लाजाँगचे खाते 29 व्या मिनिटाला डॅनियल गोन्सालव्हिसने हेडरद्वारे उघडले. मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना कर्णधार अॅलेक्स सांचेजने गोकुळाम केरळला बरोबरी साधून दिली. 75 व्या मिनिटाला शिलाँग लाजाँगचा दुसरा गोल रेनन पॉलिनोने पेनल्टीवर केला. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना लाजाँगचा तिसरा आणि शेवटचा गोल हार्डीने केला. शिलाँग लाजाँगने या स्पर्धेत चार सामन्यातून सहा गुण मिळविले आहेत.