शिवसेनेच्या मुळ गटाला दोन दिवसांपूर्वी रावतेंनी निवडणूक लढण्याच्या दिल्या होत्या सुचना : शिवसेनेच्या दोन्ही गटातील साताऱ्यात खदखद कायम
विशाल कदम/सातारा
राज्य पातळीवर शिवसेनेच्या दोन्ही गटात जो तिढा सुरु आहे तसाच तिढा सातारा शहरातील शिवसेनेच्या दोन्ही गटात अजून कायम आहे. शिवसेनेचे माजी मंत्री दिवाकर रावते हे दोन दिवसापूर्वी साताऱ्याच्या दौऱयावर येवून शिवसैनिकांना निवडणूका लढण्याच्या तयारीला लागा, असे सुचित केले गेले होते. असे असताना शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी फेसबुकवर सातारा पालिकेचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच(शिंदेगटाचाच), नगरपालिका निवडणूका शिवसेना सातारा (शिंदे गट) 50 जागा लढवणार अशी पोस्ट लिहिली असून त्यामुळे जोरदार चर्चा सध्या शिवसेनेच्या राजकीय गोटात सुरु झाली आहे.
सातारा शहरात फक्त खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या विचारांच्या आघाडय़ांचीच चलती असते. मागच्या 2016 च्या निवडणूकीमध्ये केवळ भाजपाची तिसरी आघाडी दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आली होती. त्यास पवारांनी टाकलेल्या पॅनेलच्या प्रचारासाठी तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभाही राजवाडय़ाच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडली होती. भाजपाच्या पॅनेलला त्यावेळी पाच जागा जिंकता आल्या होत्या. सातारा विकास आघाडीची सत्ता पालिकेत आली होती. नगरविकास आघाडी विरोधात होती.
हे ही वाचा : काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे शिंदे गटात जाणार?
आता नगरपालिकेच्या निवडणूका जवळ येवू लागलेल्या आहेत. दोन्ही आघाडय़ांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचीही आमदार शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती. त्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमूख बाळासाहेब शिदे यांनी हजेरी लावली होती. तर चारच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते माजी मंत्री दिवाकर रावते यांनी साताऱ्यात बैठक घेवून स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने तयारी करा, कामाला लागा अशा सुचना दिल्या आहेत. त्याच अनूषंगाने ठाकरे गटाचे सातारा शहरातील शिवसैनिक तयारीला लागले आहेत. त्यातच शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे शहरात प्रथमच मोठया प्रमाणात शुभेच्छा फलक लावले आहेत. त्यांनी पालिकेच्या निवडणूकीची तयारी सुरु केलेली असतानाच दुसऱया बाजूला एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी फेसबुक पोस्टवर नगराध्यक्ष हा शिवसेनेचा. शिंदेगटाचाच असणार आहे.
शिंदेगट 50 जागा सातारा पालिकेच्या लढवणार आहे अशी पोष्ट लिहिली गेली आहे. त्यामुळे नेमके शिंदे गटात कोण कोण असणार आहे?, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार आहेत?, की दोन्ही राजेंपैकी एक राजे शिंदेसोबत असणार आहे याचीच उलटसुलट चर्चा रविवारी दिवसभर सुरु होती. त्याबाबत निलेश मोरे यांना विचारणा केली असता मी बाईट देवू शकत नाही. मला वरुन तसे आदेश नाहीत, असे सांगितले परंतु ऑफ दी रेकॉर्ड बोलताना जिह्यातील सर्व पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका शिंदे गट लढवणार आहे. सभासद नोंदणी सुरु आहे. चांगला प्रतिसाद जिह्यातून मिळत आहे, असे त्यांनी सांगितले