शिवपुतळ्याला दुग्धाभिषेकासह विविध कार्यक्रमांचे आयोजन : सर्वत्र शिवरायांचा जल्लोष
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध गावातील संघ व संघटना यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून पुजा करण्यात आली. अनेक गावांमध्ये शुक्रवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी काही गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती असलेल्या परिसरात आकर्षक अशा भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. या सोहळ्यानिमित्त शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गायन, भाषण आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. काही ठिकाणी दिवसभर भजनी मंडळांचा भजनांचा कार्यक्रम झाला. सावगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा व शिवस्मारक सेवा समिती यांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणचे कार्यवाह कल्लाप्पा पाटील आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या कार्यक्रमाला विनोद पाटील, गजानन घाटेगस्ती, गजानन पाटील, बाळू पाटील, संदेश बानेकर, महेश पाटील, विनोद पावले, मारुती बेळगावकर आदींसह शिवभक्त उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा हलगा यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा केला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत काही तरुणांनी भाषणे केली. या सोहळ्याला तरुण व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.