कुरुंदवाड : प्रतिनिधी
शिरोळ तालुका शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजाराम सुतार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार व 12 खासदारांना सोबत घेत शिवसेनेला धक्का दिला होता. त्यानंतर पक्षातील अनेक नाराज शिदे गटाबरोबर अन्य पक्षात प्रवेश करीत आहेत.
शिरोळ तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडली आहे. जिल्ह्यातून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आज शिवसेनेचे शिरोळ विधानसभा संपर्कप्रमुख राजाराम सुतार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पुणे येथे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडून कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळत नाही. विश्वासात घेतले जात नाही. कार्यकर्त्यांची कुचंबणा होत आहे. राजकीय गळचेपी होत आहे. त्यामुळे शिववसेनेतुन बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे सांगितले.