विविध मंडळांतर्पे शिवमूर्तीचे पूजन : भगवे ध्वज, ढोलताशाच्या गजरात शहरातून चित्ररथांची भव्य मिरवणूक : शिवप्रेमींचा सहभाग
खानापूर : शहरात विविध ठिकाणी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक चौकाचौकात भगव्या पताका, झेंडे, ढोलताशांचा गजर सुरू होता. तसेच घरोघरी शिवपूजन करण्यात आले. यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. दरम्यान रात्री 8 वाजता मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पालखीचे पूजन होऊन चित्ररथ मिरवणुकीला सुरूवात झाली. यात चव्हाटा युवक मंडळ, महालक्ष्मी शिवजयंती उत्सव मंडळ, रवळनाथ युवक मंडळ यांचे चित्ररथ सहभागी झाले होते.
शिवस्मारक येथील शिवपुतळय़ास पहाटे 6 वाजता शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्यावतीने अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता शिवस्मारक ट्रस्टच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, शिवस्मारक ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांच्या हस्ते शिवपुतळय़ाचे पूजन झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विठ्ठल गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश चव्हाण, रविंद्र देसाई, आबासाहेब दळवी, यशवंत बिरजे, के. पी. पाटील, अजित पाटील यांच्यासह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर मंदिर येथील मध्यवर्ती समितीच्यावतीने दुपारी 12 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजपूजन ऍड. सचिन साळगावकर, अभिलाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश चव्हाण यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. रवि काडगी यांच्या हस्ते बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन दिलीप पवार व आबासाहेब दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी सदानंद पाटील, संतोष परमेकर, सागर पाटील, हरिभाऊ वाघधरे, पुंडलिक खडपे उपस्थित होते.
महालक्ष्मी मंदिर येथे शिवप्रतिमेचे पूजन प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय कुबल, पंडित ओगले, गजानन कुंभार, दिनकर मरगाळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लाठीमेळय़ाचे उद्घाटन करून सलामी देण्यात आली.