शिवमूर्तीचे पूजन, मर्दानी खेळ, वारकरी भजनासह देवदर्शन यात्रा जल्लोषात : छत्रपती शिवाजी उद्यान-कपिलेश्वर मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा
बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन बेळगावमध्ये जल्लोषात साजरा झाला. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून भव्य रॅली काढण्यात आली. लाठीकाठी, दांडपट्टा अशा मर्दानी खेळांसोबतच वारकरी भजन व मराठमोळ्या वेशात सहभागी झालेले युवक अशा मंगलमय वातावरणात शुक्रवारी पालखी काढली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला दुग्धाभिषेक, जलाभिषेक करण्यात आला. दीपक पवार व जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर आरती करून देवदर्शन यात्रेला सुरुवात झाली. हभप बाळू भक्तिकर महाराज व प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पालखी पूजन केले. रमाकांत कोंडुस्कर व नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन झाले.
कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे पालखीचे स्वागत
देवदर्शन यात्रेत सुरुवातीला होनगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे लेझीम पथक सहभागी झाले होते. सावगाव येथील वारकरी सांप्रदायच्यावतीने भजन सादर करण्यात आले. या शोभायात्रेत बालचमूंनी लाठीकाठी, दांडपट्टा अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले. शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये धारकरी, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक झाला, त्यानंतर ते देवदर्शनासाठी जगदीश्वराच्या मंदिरात गेले होते. त्याचप्रमाणे भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी सांगितले. वादळी पावसातही भगवा ध्वज उचलणाऱ्या खडकीकर याचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, वडगाव व अनगोळ विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, गजानन निलजकर, हिरामणी मुचंडीकर, विजय कुंटे, प्रफुल्ल शिरवळकर, अभिषेक निलजकर, मारुती पाटील, गिरीश पाटील, उदित रेगे यासह इतर धारकरी उपस्थित होते.