आता आपले मार्ग वेगळे : मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करणार का?
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
शिंदे गटाला सरकार पाडून दाखवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी यशस्वी करून दाखवलं. आता तुमचे आणि आमचे मार्ग वेगळे आहेत, तुम्ही तुमच्या मार्गाने जाऊ शकता असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना अप्रत्यक्षपणे परत न येण्याचा इशारा दिला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच, शिवसेना आता विरोधी बाकावर बसायलाही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे राऊत म्हणाले, “धनुष्यबाण जिवंत आहे सांगण्यासाठी ट्वीट टाकलं. आज इथे बसलो आहे, शिवसेनेचं मीठ खात आहे आणि १५ मिनिटांनी पळू गेलो ही आमची औलाद नाही. बहुधा उद्या दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार असून भूमिका स्पष्ट करेन. मला पक्षाचं, महाराष्ट्राचं काम करण्यापासून रोखण्यासाठी हा दबाव आहे. या दबावाला घाबरुन काहीजण पळून गेले आहेत. कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी सामोरा जाईन,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
महाविकास आघाडीची स्थापना होत असताना अनेक आमदारांना चांगली खाती मिळाली. वेगळा प्रयोग होतोय म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. शेवटी त्यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर दोषारोप करत पाठीत खंजीर खुपसला. यामध्ये हाडाचे कडवट शिवसैनिकही होते याचं दुःखं वाटतंय.
हेही वाचा : आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…; अभिनेते प्रकाश राज यांचे उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट
शिंदे गटाला सरकार पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट
शिंदे गटाला सरकार पाडून दाखवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी यशस्वी करून दाखवलं असंही राऊत म्हणाले. काही कडवट शिवसैनिक गेल्याचं आम्हाला दुख आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोक राज्य चालवत होते, पक्षाबरोबर राहून आम्ही समन्वयाने काम करत होतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास होता. सर्व जाती-धर्मातील लोकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला होता, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.
विरोधक म्हणून काम करायला तयार
महाराष्ट्रात आता नवीन सरकार येणार असेल तर आम्ही उत्तम विरोधक म्हणून बसायला तयार आहोत. आम्ही आता विरोधक म्हणून काम करू. पहिल्या दिवसापासूनच सरकार पाडू अशा धमक्या देणार नाहीत. पण पक्ष संघनटेच्या कामालाही झोकून काम करू असंही संजय राऊतांनी पुढची रणनीतीबाबत सांगताना सांगितले.
तर तुम्ही सेनेचा मुख्यमंत्री करणार का?
महाविकास आघाडीची स्थापना केली म्हणून मी जबाबदार असेन तर ठिक आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जे स्वप्न पाहिलं होतं त्या वचनासाठी मी प्रतिष्ठा पणाला लावली असेल तर मी जबाबदारी घेतो. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही ही करून दाखवा असं आव्हान राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं. राऊत म्हणाले, आता तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार का? तुमचा नेता तरी मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही आता परत चाकरीच करणार आहात, असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टोला लगावला.