चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान घडला प्रकार ः एकाचा मृत्यू ः 5 जखमी
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात रविवारी दुपारी 1.26 वाजता (अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार) एका चर्चमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. लगुना वुडस शहराच्या जिनेवा प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये झालेल्या या हल्ल्यात एका भाविकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्रही हस्तगत झाले आहे.
लगुना वुड्सच्या जिनेवा प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये रविवारी मोठय़ा संख्येत लोक प्रार्थनेसाठी एकत्र आले होते, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला आहे. 16 हजार लोकसंख्या असलेले लगुना वुड्स हे लॉस एंजिलिस शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे.
चर्चमध्ये गोळीबार झाल्यावर प्रार्थनेसाठी तेथे उपस्थित लोकांनीच हल्लेखोराला पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संबंधित स्थळाचा ताब घेत तपास चालविला आहे. काउंटी शेरिफने सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आम्ही याप्रकरणी अधिक माहिती जमविण्याचा प्रयत्न करत आहोत असे त्यांनी नमूद पेले आहे.